२०२५ पर्यंत भारतात सर्वत्र पाण्यासाठी वणवण - अभ्यासकांचा इशारा
मुंबई, दि. २४ - देशातील भूजल पातळी झपाट्याने घटत असून २०२५ मध्ये भारतात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होईल असे भाकीत एका अहवालात वर्तवण्यात आले आहे. पाणी टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होणार असले तरी यामुळे विदेशी कंपन्यांसाठी अच्छे दिन येतील अशी चिन्हे आहेत. वॉटर सेक्टरमध्ये पुढील काही वर्षांत १३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल असा दावाही या अहवालात करण्यात आली आहे.
इए वॉटर या संस्थेने भारतातील पाण्याच्या सद्यस्थितीच्या आधारे अहवाल तयार केला आहे. यानुसार कुटुंबाचे वाढते वार्षिक उत्पन्न, उद्योग व सेवा क्षेत्राच्या योगदानामुळे औद्योगिक व घरगुती क्षेत्रात पाण्याचा वापर वाढत आहे. घरगुती वापरातील ८० टक्के तर सिंचनातील ७० टक्के पाण्याची मागणी भूजलाद्वारे पूर्ण केली जाते. पण आता भूजलाची पातळी झपाट्याने घटत असून २०२५ मध्ये भारतात पाण्यासाठी वणवण भटकावे लागेल असे या अहवालात म्हटले आहे. मात्र या टंचाईमुळे जलव्यवस्थापन क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांची चांदी होण्याची चिन्हे आहेत. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, इटली, चीन असे अनेक देश भारतातील पाणी टंचाईकडे नजर ठेवून आहेत असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. पाणी पुरवठा व जल व्यवस्थापन या क्षेत्रात भारतात आगामी काही वर्षांमध्ये तब्बल १३ अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक होईल अशी चिन्हे आहेत.
महाराष्ट्र हा परदेशी कंपन्यांसाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार असून महाराष्ट्रात आत्तापासून भीषण पाणी टंचाईची समस्या आहेत. परदेशातील १३ कंपन्या राज्यातील जल व्यवस्थापनात कार्यरत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेकडून अद्याप नावाचा प्रस्ताव नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबईच्या वांद्रे टर्मिनसला देण्यासाठी आक्रमक मागणी केलेल्या शिवसेनेने किंवा पालिका स्तरावर अशाच मागणीची भाषा वापरणाऱ्या मनसेने त्यासाठी कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांचे नाव देण्याचे भाग्य लाभले तर मला आनंदच होईल, पण या क्षणापर्यंत कोणत्याच नावाची शिफारस आलेली नाही, असे स्वत: रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, की रेल्वे स्थानकांना नाव देण्याबाबत गृह मंत्रालय निर्णय घेते. तिथेच प्रस्ताव येतो. मुळात कोकणातून आणि शिवसेनेतून राजकारणात आलेल्या पण आता भाजपात असलेल्या प्रभू यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प झालाच पाहिजे, असा शिवसेनेशी विसंगत पवित्रा घेतला. अणुऊर्जा प्रकल्प झाला पाहिजे अशी माझी भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांचे हाल मला माहीत आहेत
मुंबईकरांचे हाल मला माहीत आहेत. त्यांना फक्त दिलासा नको, कृती हवी असल्याने मी काम सुरू केले. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा आधुनिक केली जात आहे. त्याचा आठवडी अहवाल मी घेत असतो. रेल्वे फलाट व डब्यांची उंची एकसारखी करणे, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची योजना आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जपानच्या सहयोगाने अभ्यास पूर्ण झाला आहे असून, या मार्गावर हाय स्पीड रेल्वेसाठी आता काहीच अडचण नाही. तीन-साडेतीन वर्षांत हा मार्ग प्रत्यक्षात येण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे केवळ स्वप्न आहे, असे समजू नये.
पुणे व नागपूर मेट्रोचा विषय राज्य सरकार व केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाशी संबंधित आहे. रेल्वे मंत्रालयाचा फार संबंध या प्रकल्पांशी नाही. पण माझे अनुकूल मत त्यांना दिले आहे. वर्षअखेर हे दोन्ही प्रकल्प गती घेतील, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.
स्मार्ट स्टेशन्स ही तर नावीन्यपूर्ण योजना आहे. मुंबईतील अंधेरी, दादर, ठाणे या स्थानकांचा लखलखता विकास येत्या तीन वर्षांत झालेला असेल. शिवाजीनगर, नागपूरचाही विकास याचबरोबरीने केला जाईल. तर वांद्रे स्थानकाचा हेरिटेज स्थानक म्हणून विकास व जोपासना केली जाणार आहे.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवर उभारण्याच्या मागणीवरून आणि त्यासाठी आक्रमक होण्याऐवजी राज्य सरकारबरोबर सामोपचाराची, शिवसेनेच्या स्वभावाशी विसंगत भूमिका घेण्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले होते. -विशेष
अनुष्का विराट बनणार 'चार धाम यात्रे'चे ब्रँड अॅम्बेसेडर
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना ब-याच टीकेला सामोरे जावे लागले होते. हे प्रकरण खूप तापल्यावरही त्यांनी या विषयावर मौन बाळगले. मात्र आता हे दोघेही आता धार्मिक बनले असून लौकरच ते 'चार धाम यात्रे'चे प्रमोशन करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे. उत्तराखंड सरकारने त्या दोघांनाही या यात्रेचे 'ब्रँड अँबॅसेडर' म्हणून नेमण्याचे ठरवले आहे.
दोन वर्षांपूर्वी जून महिन्यात उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयात संपूर्ण राज्य उध्वस्त झाले होते, हजारो नागरिकांनी प्रलयात जीव गमावला तर लाखो नागरिक बेघर झाले होते. पुरामुळे राज्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे हिंदू भाविकांसाठी श्रद्धेचं स्थान असलेल्या प्रसिद्ध 'चार धाम यात्रे'लाही त्याचा फटका बसला. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली ही यात्रा पुन्हा सुरू होणार असून 'विराट- अनुष्का' ही प्रसिद्ध जोडी यात्रेचे प्रमोशन करताना दिसणार आहे.
सरकारशी त्यासंबंधी करार करण्यासाठी हे दोघेही मंगळवारी शहरात दाखल झाले. त्यानंतर ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांचीही भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
विश्वचषकातील पराभवानंतर सोशल मीडियावरून अनुष्का- विराटवर टीकेची झोड उठली होती. सेमीफायनलमध्ये विराट अवघी एक धाव काढून बाद झाल्याबद्दलही अनुष्कालाचा जबाबदार धरत तिला पनवती ठरवण्यात आले होते.
१२ वर्षाच्या मुस्लीम मुलीने मारली भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी
मुंबई, दि. ३ - मुंबईत राहणा-या १२ वर्षाच्या मरियम सिद्दीकी या मुलीने इस्कॉनतर्फे आयोजित भगवद् गीता स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. सहावीत शिकणा-या मरियमने सुमारे ३ हजारहून अधिक स्पर्धकांना मागे टाकून स्पर्धेत बाजी मारली आहे. एकीकडे देशात घरवापसी सारख्या मोहीम राबवत देशाच्या ऐक्यात बाधा आणण्याचे उद्योग काही मंडळीकडून सुरु असताना मरियम भगवद् गीतेवरील स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावून एकतेचे संदेशच दिला आहे.
इस्कॉनतर्फे यंदा 'गीता चॅम्पियन्स लीग' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गीतेवर आधारीत १०० मार्कांचे प्रश्न विचारण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने भगवद् गीतेचा अभ्यास करण्याची संधी मिळाल्याने मी या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असे मरियम सांगते. मरियमच्या या निर्णयाला तिच्या आईवडिलांनीही पाठिंबा दिला. मरियम सध्या मीरा रोडमधील कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये शिकते.मला धर्मांचा अभ्यास करायला आवडतो व फावल्या वेळेत मी विविध धर्मांवरील पुस्तकांचे वाचन करते असे मरियम नमूद करते. परीक्षेपूर्वी मी भगवद् गीतेचा अभ्यास केला, गीतेतून आपल्याला काय शिकायला मिळते हे मी समजून घेतले व मगच स्पर्धेत उतरल्याचे मरियम आत्मविश्वासाने सांगते. एका मुस्लिम मुलीने भगवद् गीतेवरील स्पर्धेत बाजी मारल्याने शाळेतील शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. आमच्या कुटुंबाने कधीच धर्मात भेदभाव केला नाही. सर्व धर्म समान आहेत, प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्मांचा आदर करावा व त्या धर्मांचा स्वीकारही करावा असे मरियमचे वडिल फारुख सिद्दीकी यांनी सांगितले. कोणत्याही धर्मात हिंसा किंवा द्वेष करणे शिकवले जात नाही. दुर्दैवाने आपल्याकडे काही जण असा चुकीचा संदेश पसरवतात असे फारुख यांनी स्पष्ट केले. या सर्व गोष्टींचा आपल्या मुलांवर चुकीचा परिणाम होण्यापूर्वी पालकांनी मुलांशी संवाद साधून काय चुकीचे आहे हे मुलांना समजवावे असा सल्लाही त्यांनी अन्य पालकांना दिला.
मोदी - शहांनी करुन दाखवलं, भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष
लोकसभेत भाजपाला भरघोस मताधिक्य मिळवून देणारे नरेंद्र मोदी व त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांमध्ये भाजपाचा झेंडा रोवणारे पक्षाध्यक्ष अमित शहा या जोडीने आता भाजपाला जगातील सर्वात मोठा पक्ष अशी नवी ओळख मिळवून दिली आहे. भाजपाने सदस्य नोंदणी अभियानात तब्बल ८.८ कोटी सदस्यांना पक्षाशी जोडून चीनच्या कम्यूनिस्ट पक्षाला धोबीपछाड केले आहे.
लोकसभा व विधानसभेत मिळालेल्या यशानंतर भाजपाने देशभरात सदस्य नोंदणी अभियान राबवायला सुरुवात केली आहे. या मोहीमेत भाजपाने रविवारी ८.८ कोटी सदस्यांचा आकडा गाठला आहे. जगात चीनमधील कम्यूनिस्ट पक्षाचे सर्वाधिक म्हणजेच ८.६ कोटी सदस्य असून जगातिल सर्वात मोठा पक्ष हा विक्रम कम्यूनिस्ट पक्षाच्या नावावर होता. मात्र भाजपाने चीनच्या कम्यूनिस्टांना मागे टाकत अव्वल क्रमांक गाठला आहे. आगामी महिनाभरात पक्ष १० कोटींचा आकडा सहज गाठेल अशी आशा पक्षातील वरिष्ठ नेते वर्तवत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा येत्या काही दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन या विक्रमाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधून भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी RPI मध्ये यावे - आठवले
मुंबई, दि. २९ - आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची आपमधून हकालपट्टी झालेली असतानाच आपमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कंबर कसली आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी आरपीआयमध्ये यावे असे सांगत आठवलेंनी दोन्ही नेत्यांनी साद घातली आहे.
प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना पक्षाविरोधी कारवाया केल्याचा आरोपावरुन आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आपमधील अंतर्गत संघर्ष चांगलाच रंगात आला असताना या वादात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी उडी मारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच आरपीआयची स्थापना झाली आहे. आम आदमी पक्ष व आरपीआयची विचारधारा समान असल्याने या दोन्ही नेत्यांनी आरपीआयमध्ये यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे. आठवले यांच्या आवाहनाला योगेंद्र यादव व प्रशांत भूषण कितपत प्रतिसाददेतील हादेखील मोठा प्रश्नच आहे.
मायकल क्लार्कचा 'वनडे'ला अलविदा
- ऑनलाइन लोकमतसिडनी, दि. २८ - विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी अवघ्या काही तासांवर आलेली असतानाच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे आणि त्याचे कारण आहे कर्णधार मायकेल क्लार्कचा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय. उद्या (रविवार) पार पडणा-या विषश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर मायकेल क्लार्क वनडे क्रिकेटला अलविदा करणार आहे. खुद्द क्लार्कनेच ही घोषण केली.'उद्या माझा शेवटचा वनडे सामना असेल. याबाबत मी माझे प्रशिक्षक आणि संघातील सहका-यांशी चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियातर्फे खेळायला मिळालं हे मी माझं भाग्य मानतो. पुढील विश्वचषकापर्यंत मी शारिरीकदृष्ट्या फिट असेन याची खात्री नाही, त्यामुळे निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ आहे' असे सांगत क्लार्कने त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.३३ वर्षीय मायकेल क्लार्कने २००३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सूरूवात केली असून आत्तापर्यंत त्याने २४४ वनडे सामने खेळले आहेत. चार वर्षांपूर्वी त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र गेल्या काही काळापासून तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त असून त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटीत मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते. मात्र योग्य ते उपचार आणि परीश्रम घेऊन तो हा वर्ल्डकप खेळण्यास सज्ज झाला होता. पण त्या दुखण्याने पुन्हा उचल खाल्ल्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त होत आहे.मायकेल क्लार्कची वनडे कारकीर्दवनडे सामने : २४४धावा : ७९०७शतके : ८अर्धशतक : ५७सर्वोच्च धावसंख्या : १३०
हिट अँड रन प्रकरण, मद्यपान केले नसल्याचा सलमानचा दावा
मुंबई, दि. २७ - हिट अँड रनप्रकरणातील सर्व आरोप फेटाळून अभिनेता सलमान खानने फेटाळून लावले आहेत. घटनेच्या दिवशी मी मद्यपान केले नव्हते व गाडीही चालवत नव्हतो असे सलमानने कोर्टासमोर म्हटले आहे. अपघातानंतर माझा ड्रायव्हर अशोक सिंह पोलिसांकडे कबुली जबाब द्यायला गेला होता पण पोलिसांनी त्याचा जबाब का नोंदवला नाही हे मला माहित नाही असे सलमानने नमूद केले आहे.
२००२ मधील हिट अँड रनप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात शुक्रवारी अभिनेता सलमान खानला कोर्टासमोर स्वतःचा बचाव करण्याची शेवटची संधी होती. सलमानने हिट अँड रन प्रकरणातील पोलिसांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मद्यपानासाठी लिकर लायसन्स लागतो याची मला माहिती नव्हती असे सलमानने म्हटले आहे. घटनेच्या दिवशी मी गाडी चालवत नव्हतो, माझा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता असा दावाही त्याने केला. या प्रकरणात माझ्यावतीने आणखी दोन साक्षीदार कोर्टासमोर हजर करु असे सलमानने सांगितले.
या खटल्यात आरोपीला बचावाची संधी असते. त्यानुसार आरोपी पक्षाने स्वतःचा बचाव केला असे सरकारी वकिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
सामन्यावर भारताची पकड, ऑस्ट्रेलियाला ४ बाद २३९
सिडनी, दि. २६ - मॅक्सवेलपाठोपाठ (२३) फिंचही (८१) बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले असून त्यांनी ४० षटकांत ४ गडी गमावत २३० धावा केल्या आहेत. सध्या कर्णधार मायकेल क्लार्क (१०) आणि वॉटसन (४) खेळत आहेत. भारतातर्फे उमेश यादवने ३ तर अश्विनने १ गडी बाद केला.
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र तिस-या षटकात वॉर्नर अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. मात्र स्टीव्हन स्मिथने (१०५) अॅरॉन फिंचच्या (८१) साथीने संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्या दोघांपुढे भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरत होते. मात्र १०५ धावांवर खेळणा-या स्मिथला यादवने बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची स्थिती २ बाद १९७ झाली. त्यानंतर २३२ धावसंख्या असताना मॅक्सवेल अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि त्यापाठोपाठ फिंचलाही यादवने बाद केल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती ४० षटकांत ४ बाद २३३ अशी झाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी संघात एकही बदल केला नसून, संघ कायम ठेवला आहे. आजचा सामना जिंकून फायनलमध्ये धडक मारण्यास दोन्ही संघ उत्सुक असून प्रेक्षकांना काटें की टक्कर पहायला मिळणार आहे, हे मात्र नक्की.
सहा आठवड्यांआधी उभय संघ कसोटी व त्यानंतर तिरंगी मालिकेत परस्परांविरुद्ध खेळले. त्यात मायकेल क्लार्कच्या संघाने भारताला एकही विजय साकार करू दिला नव्हता. क्रिकेटविश्वात ज्याप्रमाणे आॅस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिका व भारत-पाक यांच्यातील सामन्यांची चर्चा होते तशीच चर्चा गेल्या काही वर्षांपासून भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांची होत आली आहे.
अभिनेता शशी कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना सिनेसृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारतर्फे भारतीय सिनेसृष्टीत अतुलनीय कामगिरी करणा-यांना दादासाहेब फाळके हा पुरस्कार दिला जातो. दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी अशा असंख्य चित्रपटांमधील भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान पटकावणारे शशी कपूर यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ मध्ये कोलकाता येथे झाला असून त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. वडिल पृथ्वीराज कपूर, भाऊ राजकपूर आणि शम्मी कपूर यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा शशी कपूर यांनीही जपला. पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वीराज कपूर यांच्या नाटकांमध्ये शशी कपूर यांनी बाल कलाकाराचे काम केले. वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. १९४० च्या दशकात त्यांना मोठ्या पडद्यावर संधी मिळाली. आग या चित्रपटात राज कपूर यांच्या बालपणीची भूमिका करणारे शशी कपूर हे कौतुकास पात्र ठरले. १९६१ मध्ये धर्मपूत्र या सिनेमात त्यांनी प्रमुख कलाकाराची भूमिका निभावली. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटला. पण शशी कपूर खचले नाहीत. यानंतर शशी कपूर यांचा जब जब फूल खिले चांगलाच गाजला व सिनेसृष्टीत शशी कपूर सुपरस्टार ठरले. ११५ हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
विंडिजला १४३ धावांनी नमवत न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये दाखल
- ऑनलाइन लोकमतवेलिंग्टन, दि. २१ - विश्वचषकाच्या चौथ्या व शेवटच्या क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडने वेस्टइंडिजचा १४३ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला विक्रमी द्विशतक झळकावणारा मार्टिन गपटील. मार्टिन गपटीलने अवघ्या १५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावत एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा पहिला न्यूझीलंडचा खेळाडू असा विक्रमही केला आहे. पहिली फलंदाजी करताना न्यूझीलंडने वेस्ट इंडिजसमोर ३९३ धावांचा डोंगर रचला आणि जिंकण्यासाठी ३९४ धावांचे आव्हान ठेवले. परंतु ख्रिस गेलच्या ६१ धावांची खेळी संपुष्टात आल्यावर न्यूझीलंडसाठी सामना जिंकणं हा केवळ उपचार राहिला होता. किवींनी विंडिजचा डाव २५० मध्ये ३० षटकांमध्ये गुंडाळला आणि सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला.एकदिवसीय सामन्यात द्विशतक करण्याचा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू असा मान मार्टिन गपटीलने मिळवला आहे. विश्वचषकात द्विशतक करण्याचा विक्रम करणारा ख्रिस गेलपाठोपाठ तो दुसरा फलंदाज ठरला आहे. गपटीलने १५२ चेंडूंमध्ये २०० धावा केल्या. त्यानंतरही गपटीलने वेस्टइंडिजच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवताना नाबाद २३७ धावा केल्या. गपटीलला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.तीन गडी बाद करणा-या वेस्ट इंडिजच्या सर्वात यशस्वी ठरलेल्या जेरोम टेलरच्या सात षटकांमध्येही न्यूझीलंडने ७१ धावा केल्या हे बघता गपटील व त्याच्या सहका-यांनी केलेलं आक्रमण लक्षात येतं. ख्रिस गेलने झंझावाती खेळी करत काही काळ विंडिजच्या आशा जिवंत ठेवल्या, परंतु न्यूझीलंडच्या अचूक मा-यापुढे आणि मोठ्या धावसंख्येच्या दबावाखाली विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि अखेर १४३ धावांनी पराभूत होत विंडिजचा संघ गारद झाला.आता २४ मार्च रोजी न्यूझीलंड पहिली सेमीफायनल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळेल आणि त्यांच्यात जिंकणा-या संघाची अंतिम लढत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेत्याशी होईल.
वंदे मातरम न बोलणा-यांनी भारतात राहू नये - साध्वी प्राची
लखनौ, दि. १९ - भारत माता की जय व वंदे मातरम बोलण्यास नकार देणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केले आहे. भारताला महात्मा गांधीजींमुळे नाही तर भगत सिंग व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळू शकले असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तरप्रदेशमध्ये पार पडलेल्या हिंदू संमेलनात साध्वी प्राची यांनी वादग्रस्त विधांनाची मालिका सुरुच ठेवली. भारत माता की जय, वंदे मातरम न म्हणणारी मंडळी व गोवंशा हत्या करणा-यांना भारतात राहण्याचा हक्क नाही असे प्राची यांनी सांगितले. दोन पेक्षा अधिक मुलं असलेल्यांना हिंदू किंवा मुस्लीम दाम्पत्त्यांना मतदान करण्यापासून रोखले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
वॉट्स अॅपवर अपमान केला म्हणून महिलेेला चाबकाच्या ७० फटक्यांची शिक्षा
वॉट्स अॅपवर पुरुषाचा अपमान केला म्हणून सौदी अरेबियातील न्यायालयाने एका महिलेला चाबकाचे ७० फटके मारण्याची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने महिलेला तब्बल पाच हजार डॉलर्सचा दंडही ठोठावली आहे.
सौदी अरेबियातील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार पूर्व सौदी अरेबियातील अल कातिफ कोर्टात एका पुरुषाने महिलेविरोधात याचिका दाखल केली होती. संबंधीत महिलेने वॉट्स अॅपवर अपमान करुन माझी प्रतिमा मलिन केली असे या तक्रारदार पुरुषाचे म्हणणे होते. महिलेनेही कोर्टासमोर पुरुषाचा वॉट्स अॅपवर अपमान केल्याची कबुली दिली. यानंतर कोर्टाने महिलेला दोषी ठरवत तिला चाबकाचे ७० फटके मारण्याची शिक्षा सुनावली. याशिवाय ५, ३३२ डॉलर्सचा ( सुमारे ३ लाख ३४ हजार रुपये) दंडही ठोठावला. महिलेने वॉट्स अॅपवर नेमके काय विधान केले होते, महिलेचे राष्ट्रीयत्व याविषयीची माहिती समोर आलेली नाही.
सौदी अरेबियातील सायबर अॅक्टनुसार तंत्रज्ञानांच्या मदतीने दुस-यांची प्रतिमा मलिन करणे हा गुन्हा असून यानुसार एक वर्षाचा तुरुंगवास किंवा ५ लाख सौदी रियाध (सौदीतील चलन) असा दंड आहे. गेल्या वर्षी जुलैमध्येही दोघा महिलांना वॉट्स अॅपवर एकमेकांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी १० दिवसांचा तुरुंगवास व चाबकाचे २० फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.
पश्चिम बंगालमध्ये मौलवींच्या विरोधानंतर महिलांचा फुटबॉल सामना रद्द
मालदा (पश्चिम बंगाल), दि. १७ - महिला फुटबॉलपटूंच्या कपड्यांवर मौलवींनी आक्षेप घेतल्याने पश्चिम बंगाल सरकारने मालदा जिल्ह्यातील महिलांसाठी आयोजित केलेला फुटबॉल सामन्याला परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. ममता बॅनर्जी सरकारच्या या निर्णयावरुन क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
मालदासारख्या ग्रामीण भागातील महिलांना फुटबॉलकडे आकर्षित करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह यूथ क्लबतर्फे फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यात कोलकाता व राष्ट्रीय पातळीवर खेळणा-या महिला फुटबॉलपटू सहभागी होणार होत्या. या सामन्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील काही महिला खेळाडू मालदा येथे दाखलही झाल्या होत्या. मात्र आयत्या वेळी स्थानिक गट विकास अधिका-यांनी सामन्याला परवानगी नाकारली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सांगत प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मालदा हा मुस्लीम बहुल भाग असून या समाजातील मौलवींनी महिलांच्या फुटबॉल सामन्यांवर आक्षेप घेतला होता. फुटबॉल सामन्यातील महिला खेळाडूंच्या कपड्यांवर या मौलवींनी आक्षेप होता. याशिवाय फुटबॉल खेळणे हे शरियत कायद्याच्या विरोधात असल्याचा सूरही काही मौलवींनी लगावला. या मौलवींच्या दबावापुढे नमते घेत स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली नाही असा आरोप आयोजकांनी केला आहे.
कोण कोणाचं चुंबन घेतंय हे कळेलच ? - रामदास कदम यांचा भाजपावर निशाणा
मुंबई, दि. १६ - विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावरुन सोमवारी शिवसेना व भाजपामध्ये चांगलीच जुंपली. कोण कोणाचं चुंबन घेतय हे लवकरच कळेल अशा शब्दात शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपावर निशाणा साधला. तर शिवसेनेत काय चाललंय हेच कळत नसेल तर इथं काय चाललंय हे कसं कळणार असा चिमटा भाजपा आमदार गिरीश बापट यांनी कदम यांना काढला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. ७८ सदस्य असलेल्या विधान परिषदेत हा प्रस्ताव मंजुर होण्यासाठी ४० मतांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकजे २८ आमदारांची संख्याबळ असून प्रस्ताव मंजुर व्हावा यासाठी राष्ट्रवादीला आणखी १२ आमदारांची गरज आहे. यासाठी राष्ट्रवादीला भाजपाची साथ मिळण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेत भाजपाचे १२ आमदार आहेत. शिवसेनेचे विधानपरिषदेत सात आमदार असून ते या प्रस्तावावर तटस्थ राहतील असे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीने आज प्रस्ताव मांडल्यावर काँग्रेसने राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील भूमिका काय असा सवाल काँग्रेसचे आमदार माणिकराव ठाकरे यांनी विचारला. तर शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी तिखट शब्दात भाजपा व राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीने काँग्रेसला तर भाजपाने शिवसेनेला फसवलं असून भाजपा व राष्ट्रवादी कधी एकत्र आले हे आम्हालाही कळले नाही असे कदम यांनी सांगितले. यावर भाजपा आमदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला.
डीडीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप
- नवी दिल्ली, दि. १५ - प्रसारभारतीच्या डीडी वाहिनीत काम करणा-या एका महिलेने वाहिनीच्या वरिष्ठ अधिका-यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या वरिष्ठ अधिका-याविरोधात तक्रार केल्यावर पिडीत महिलेची दुस-या कार्यालयात बदली करण्यात आली असून पोलिसही तक्रार दाखल करत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.दुरदर्शनमध्ये प्रॉडक्शन असिस्टंट या पदावर काम करणा-या महिला कर्मचा-याने वाहिनीच्या सहाय्यक दिग्दर्शकाविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने हे कृत्य सुरु केल्याचे पिडीत महिलेचे म्हणणे आहे. महिलेने मुझफ्फरनगर दंगलीसंदर्भात एका डॉक्यूमेंटरी तयार केली होती व ही डॉक्यूमेंटरी बघण्याच्या बहाण्याने संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने मला रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवले.रात्री उशीरा कॅबिनमध्ये बोलवून माझ्याशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्नही केला असा दावा महिलेने केला आहे. गेल्या वर्षी एका कार्यक्रमात डीडीच्या सर्व कर्मचा-यांसमोर संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे संबंधीत महिला ही स्वतः कार्यालयातील महिला अत्याचार विरोधी समितीच्या सदस्य आहेत.पिडीत महिलेने दिल्लीतील टिळक मार्ग पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली असून पोलिस गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करत आहे असा आरोप महिलेने केला आहे. तर डीडीचे उच्चपदस्थ अधिकारीही माझ्या तक्रारींची दखल घेत नाही. याऊलट डीडीच्या मंडी हाऊस कार्यालयातून माझी बदली सेंट्रल प्रॉ़डक्शन सेंटरमध्ये करण्यात आली असे महिलेने सांगितले. तर महिलेने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप चुकीचे असल्याचे संबंधीत सहाय्यक दिग्दर्शकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. मुझफ्फरनगरवरील डॉक्यूमेंटरी पुरस्कारांसाठी पाठवली नसल्याने महिला नाराज होती असे या दिग्दर्शकाने म्हटले आहे. महिलेने यापूर्वीही डीडीच्या वरिष्ठ अधिका-यांकडे माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर माझी चौकशीही झाली पण समितीने या तक्रारीत तथ्य आढळले नव्हते असे या दिग्दर्शकाने स्पष्ट केले.
केंद्राचा राहुल गांधींवर वॉच
उपाध्यक्ष राहुल गांधी यांची केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारराजकीय हेरगिरी करीत असल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केल्यानंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले. सरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने आक्रमक निदर्शने केली, तर पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या सविस्तर स्पष्टीकरणाचा आग्रह काँग्रेसने धरला आहे.
राहुल गांधींवर पाळत आणि हेरगिरीचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा इशाराही दिला आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र हेरगिरीचा आरोप फेटाळला आहे. काँग्रेसच्या आरोपांचे खंडन करताना भाजपाने खा. राहुल यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे.
गांधी यांच्या कर्मचाऱ्यांनी दिल्ली पोलिसांतील अधिकाऱ्यास त्यांच्याबद्दल अनावश्यक आणि निरर्थक माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात पकडले होते, असा काँग्रेसचा दावा आहे. त्याचवेळी हा केवळ एक सुरक्षेचा मुद्दा असल्याबाबत पोलिसांच्या दाव्याचे काँग्रेसने खंडन केले.
पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू
सिंघवी यांनी येथे पत्रकारांना या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती दिली. दिल्ली पोलिसांतील शमशेरसिंग नामक साहाय्यक उपनिरीक्षकाने राहुल यांचे केस, त्यांच्या डोळ्यांचा रंग, वय, उंची, ते कुठल्या प्रकारचे बूट घालतात, त्यांच्या वडिलांचे नाव काय आणि त्यांनी कोणकोणत्या ठिकाणचा
दौरा केला आहे, यासंदर्भात चौकशी
केली होती. एवढेच नाहीतर त्यांच्या सहकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि पत्तेही त्याने मागितले होते. काँग्रेस उपाध्यक्षांच्या निवासस्थानी बंदोबस्तात तैनात विशेष सुरक्षा गटाच्या (एसपीजी) जवानांनी
त्याला रोखले आणि टोकलेही होते, असे त्यांनी सांगितले.
सिंघवी यांनी हा एक गंभीर राष्ट्रीय मुद्दा असल्याचे सांगून याची तुलना गुजरातच्या कथित फोन टॅपिंगच्या घटनेशी केली. सर्व पक्षांनी एकजुटीने या विरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहनही केले.
हे गुजरात मॉडेल
हे हेरगिरीचे गुजरात मॉडेल असल्याचा आरोप सिंघवी यांनी केला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना एका महिलेच्या कथित हेरगिरी प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना तसेच पंतप्रधानांचा नामोल्लेख न करता आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांची हेरगिरी आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे हे गुजरात मॉडेल असू शकते भारतीय मॉडेल नाही, असा हल्लाबोलच त्यांनी केला.
राहुल गांधी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूहोण्यापूर्वीच चिंतन रजेवर गेले आहेत. काँग्रेस नेत्यांनाही त्यांच्या ठावठिकाण्याबाबत काही कल्पना नाही. राजकीय वर्तुळातही त्यांचा हा अज्ञातवास उत्सुकतेचा विषय झाला आहे.
हेरगिरीचीही चौकशी
खा. राहुल यांच्या चौकशीसाठी गेलेल्या कथित पोलिसांबाबत माहिती घेण्याकरिता दिल्ली पोलिसांचे एक पथक शनिवारी कामाला लागले. अतिरिक्त पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) जतीन नरवाल यांच्या नेतृत्वातील या पथकाने गांधींच्या तुघलक मार्गस्थित निवासस्थानी जाऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. हे पथक चौकशीअंती पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना अहवाल सादर करेल.
भाजपाचा प्रतिहल्ला
मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसवर भाजपाने प्रतिहल्ला चढवला. नियमित प्रक्रियांमध्ये कटकारस्थान शोधण्याची या पक्षाला सवय असून हा पक्ष कायद्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ मानतो, असा आरोप भाजपाने केला. राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दलही या पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे काँग्रेस एवढी त्रस्त झाली आहे की, यामुळे पक्षातील नेत्यांचे मानसिक संतुलनच बिघडले आहे, अशी टीका भाजपाने केली.
दिल्ली पोलीस विचारतात राहुल गांधी दिसतात कसे?
नवी दिल्ली, दि. १४ - काही दिवसांची रजा घेऊन अज्ञातवासात गेलेले राहुल गांधी नक्की दिसतात कसे असा प्रश्न खुद्द दिल्ली पोलिसांनीच विचारल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षाचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी हे सर्वांना परिचित आहेत, मात्र ते कसे दिसतात याबाबत दिल्ली पोलिसांनी चौकशी केल्याचे वृत्त असून काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस मुख्यालयाला भेट दिली आणि राहुल गांधी कसे दिसतात, त्यांच्या केसांचा आणि डोळ्यांचा रंग कसा आहे असे प्रश्न विचारत चौकशी केली. तसेच त्यांच्या शारीरिक ठेवणीचे वर्णनही करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस पक्षातून नाराजी व्यक्त करण्यात आली असून पक्षाने तीव्र आक्षेपही नोंदवला आहे.
राहुल गांधी हे खासदार असल्याने संसदेत त्यांच्याविषयी सर्व माहिती आहे, इंटरनेटवरही त्यांचे फोटो उपलब्ध आहेत. असे असतानाही पक्षाच्या मुख्यालयात जाऊन त्यांच्याबद्दल चौकशी करण्याची का गरज होती, असा सवाल काँग्रेसने केला आहे. दिलील पोलिसांनी मात्र आपण राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात आहेत. ते सध्या नक्की कुठे आहेत, याबाबत कोणालाच माहित नसून त्याबद्दल चर्चा सुरू असतानाचा पोलिसांनी केलेल्या या चौकशीमुळे आता नवीन चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील 'नाईट लाइफ'वरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
लाईफ' सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असतानाच न्यायालयाने त्याआधी सरकारला खडे बोल सुनावीत चांगलेच फटकारले आहे. नाईट लाइफ सुरु झाल्यास रात्रभर मद्याची दुकाने व पब सुरु ठेवणार आहात का ? जर रात्रभर दुकाने उघडी ठेवली तर महिलांच्या सुरक्षाच्या आढावा राज्य सरकारने घेतला आहे का? असा प्रश्न विचारीत आधी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घ्या मग नाईट लाइफ सुरु करा असा सल्ला न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईतील गेल्या काही दिवसांतील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून खटला दाखल करुन घेत उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने डान्सबार बंदीमुळे महिलांवरील होणारे अत्याचार कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत 'नाइट लाइफ' सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पण मद्याची दुकाने आणि पब रात्रभर सुरु राहणार आहेत का? संख्य कमी असल्याने पोलिस यंत्रणेवर आधीच दबाव असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा 'नाइट लाइफ' वेळी महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम आहेत का? आणि सरकारने असा निर्णय घेतला असेल तर रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे का? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले. तीन आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करा व विविध तंज्ञामार्फत आढावा घ्यावा असे आदेश सरकारला दिले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने नाईट लाइफच्या निर्णयाची अंमलबजावणी करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुंबईतील नाईट लाइफ बारगळण्याची शक्यता अधिक आहे.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश
ईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याची तातडीने सुटका करण्याचा आदेश इस्लामाबाद कोर्टाने दिला आहे. लख्वी याने केलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्या. नोरूल हक्क यांनी लख्वीचा याचिका मान्य करत त्याची तुरूंगातून सुटका करण्याचा आदेश दिला.
लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात असून त्याच्यावर मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. मात्र त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या वर्षी त्याची सुटका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी नोंदवत या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीला दुस-या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम कायम राहिला. मात्र आद पुन्हा इस्लामाबाद न्यायालायने त्याच्या सुटकेचा आदेश दिल्याने खळबळ माजली आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते
गुजरातचे पाणी मुंबईला!
मुंबई : दमण गंगा-पिंजाळ खोऱ्यातले ७५ टक्के पाणी महाराष्ट्राला मिळणार आहे, ते सगळे पाणी मुंबईला दिले जाईल. ज्यामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल आणि वैतरणाचे पाणी गोदावरीत नेले जाईल, असे सांगून महाराष्ट्राच्या वाट्याचे थेंबभरही पाणी अन्य कोणाला दिले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी मुंबईसह राज्यातले अनेक विषय मांडले. दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे आणि सरकारपुढचे संकट संपलेले नाही, येत्या १३ आणि १४ तारखेला पुन्हा काही भागांत गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविलेली आहे. त्यामुळेच सरकारने पॅकेज घोषित केलेले नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले. तब्बल दोन तास केलेल्या भाषणात त्यांनी नागपूर अधिवेशनात केलेल्या भाषणाचीच पुनर्रावृत्ती केली. ठिबक सिंचनाचे पैसे तीन वर्षे आघाडी सराकरने दिले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्याची शासनाची मानसिकता आहे असे सांगून त्यासाठी तीन बैठका झाल्याचे ते म्हणाले.
टोल नाक्याच्या करारात बाय बॅक नाही मुंबई -पुणे व मुंबई एन्ट्री पॉर्इंट या बड्या टोल नाक्यांचे करार करताना आघाडी सरकारने बाय
बॅकचा मुद्दाच करार करतेवेळी टाकला नाही.
त्यामुळे हे करार रद्द करता येत नाहीत, तरीही आम्ही वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, पण टोलमुक्त करण्याची आमची भूमिका कायम ठेवू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
टोल करार करताना राज्याला १५ टक्के वाहनांवर पासेस देण्याचा अधिकार आहे.
प्रत्यक्षात ही सूट घेणारी एकच टक्का वाहने आहेत. उर्वरित १४ टक्के सूट थेट ठेकेदारांना करार करुन दिली गेल्याचा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.
कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी पटियाला
हाऊसच्या विशेष न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी म्हणून
समन्स बजावले आहे. ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना
देण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी हिंदालको कंपनीचे कुमार मंगलम बिर्ला,
पी.सी.पारेख यांच्यासह आणखी तिघांना आरोपी म्हणून समन्स बजावले आहे.
गुन्ह्याचा कट, विश्वासघात आणि भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यातील
तरतुदींनुसार न्यायालयाने समन्स बजावले आहे.
कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला वितरीत करण्यात आलेल्या
कोळसा खाणपट्ट्यांबाबत सीबीआयने यापूर्वी मनमोहन सिंग यांची चौकशी केली
होती.
सन २००५ मध्ये हिंदाल्कोला तालाबीरा-२ या कोळसा खाणपट्ट्याचे वाटप
केले गेले होते़ त्या वेळी कोळसा मंत्रालयाचा कार्यभार मनमोहन सिंग
यांच्याकडे होता. सीबीआयने याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र
त्यानंतर विशेष न्यायाधीश भरत पराशर यांच्या न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा
सीबीआयकडे पाठवत पुढील चौकशीचे आदेश दिले़. तत्कालीन कोळसा मंत्री मनमोहन
सिंग यांचा विविध पैलूंवर आधी जबाब नोंदवणे योग्य ठरेल, असे सांगत
न्यायालयाने सदर प्रकरणी आणखी चौकशीची गरज अधोरेखित केली. त्यानंतर मनमोहन
सिंग यांची चौकशी करण्यात आली.
दरम्यान समन्स बजावण्यात आल्यामुळे मी दु:खी असलो तरी कोणत्याही चौकशीस तयार असल्याची प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली.
पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्र
- ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. १० - दहशतवादाने पोखरलेल्या पाकिस्तानकडे भारतापेक्षाही जास्त अण्वस्त्र असल्याची माहिती एका संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. पाकिस्तानकडे १२० अण्वस्त्र असून सर्वाधिक अण्वस्त्र असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. जगभरातील निम्म्याहून अधिक अण्वस्त्र रशिया व अमेरिका या देशांकडे असल्याचे अहवालात म्हटले आहे.शिकागो विद्यापीठातील शास्त्रज्ञांमार्फत जगभरातील अण्वस्त्र धारक देशांचा अभ्यास केला जातो. या शास्त्रज्ञांनी जगभरातील अण्वस्त्रांबाबत अहवाल सादर केला आहे. सध्या जगात नऊ देशांकडे अण्वस्त्र असून एकूण अण्वस्त्रांची संख्या १०,१४४ ऐवढी आहे. यात अमेरिकेकडे ४,८०४ तर रशियाकडे ४,४८० अण्वस्त्र आहेत. फ्रान्सकडे ३००, चीनकडे, युरोपियन संघाकडे २२५ अण्वस्त्र आहेत. पाकिस्तानकडे १२० तर भारताकडे ११० अण्वस्त्र आहेत. इस्त्रायलकडे ८० अण्वस्त्र आहेत. उत्तर कोरियाकडे आत्तापर्यंत अण्वस्त्र नसले तरी त्यांनी आत्तापर्यंत ३ वेळा अण्वस्त्रांची चाचणी करुन बघितले आहे. शीत युद्धाच्या काळात जगभरात ६० हजारहून अण्वस्त्र होती. त्यातुलनेत आता अण्वस्त्रांची संख्या कमी झाली हे दिलासादायक चित्र असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तर पाकिस्तानसारख्या दहशतवादग्रस्त देशात अण्वस्त्रांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असल्याचे संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
दिल्लीत 'आप'च्या पराभवासाठी भूषण व यादव करत होते प्रयत्न
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १० - गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षात सुरू असलेला संघर्ष आज अधिक उफाळून आला आहे. शांती भूषण व प्रशांत भूषण हे पिता-पुत्र आणि व योगेंद्र यादव हे तिघे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न करत होते असा आरोप 'आप'च्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे. मनिष सिसोदिया, गोपाळ राय, संजय सिंह व पंकज गुप्ता यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात शांती भूषण, प्रशांत भूषण व योगेंद्र यादवना लक्ष्य करण्यात आले असून त्यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.'दिल्ली निवडणुकीत आपला यश मिळावे यासाठी पक्षाचे कार्यकर्ते झटत असतानाच प्रशांत भूषण, शांती भूषण व योगेंद्र यादव हे पक्षाचा पराभव व्हावा असा प्रयत्न करत होते', असे त्यात म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी प्रशांत भूषण यांनी पक्षाच्या इतर राज्यांतील नेत्यांनी फोन करून दिल्लीत प्रचारासाठी येऊ नये असे सांगितले. तसेच पक्षाला देणगी देण्यापासूनही लोकांना रोखण्यात आले. तर योगेंद्र यादव हे राष्ट्रीय वृत्तपत्रांना केजरीवाल यांच्या विरोधात बातम्या पुरवत होते, असे आरोप पत्रकात करण्यात आले आहेत.
कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नका - पंतप्रधान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - देशाची एकात्मता व अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलमच्या सुटकेबाबतचा आक्रोश हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व देशाचा असून असून यात पक्षीय राजकारण नको असेही त्यांनी सुनावले.
फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्यानंतर याच मुद्यावर लोकसभेत स्पष्टीकरण देताना त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असे स्पष्ट केले. फुटीरतावादी व दहशातवादाविरोधात लढा देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत याप्रकरणी योग्य ती पावले उचलू असे आश्वासनही त्यांनी दिले.
मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा केलेली नाही असे सांगत काश्मीरमधील घटनांबद्दल आम्ही अनभिज्ञ असल्याचेही ते म्हणाले.
मसरत आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे.
मसरत आलमच्या सुटकेवरून लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब
नवी दिल्ली, दि. ९ - फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. मसरतच्या सुटकेचा निर्णय मुफ्तींनी एकट्याने घेणे शक्य नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असावी असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. मात्र आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्याबद्दल सरकारला कुठलीही माहिती नव्हती व सराकार या निर्णयात केंद्र सरकार सहभागी नव्हते असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे
काठमांडू येथे टर्किश एअरलाइनच्या विमानाला अपघात
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि ४ - काठमांडू येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळे अपघात झाला आहे.
दाट धुक्यामुळेहे विमान दुस-यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिभुवनदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्किश एअरलाइनचे A330 हे विमान उतरत होते. धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात उतरणे धोकादायक असल्याने वैमानिकाने दुस-यांदा हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात झाला असल्याचे नेपाळ नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे या A330 या विमानातील २३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात संरक्षण यंत्रणेला यश आले आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाला गंभीर जखम झाली नसल्याचेही सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री ताफ्यातील गाडीने धडक दिल्याने एक जण ठार
करनाल, दि. ३ - हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या ताफ्यातील एका गाडीने धडक दिल्याने पदचा-याला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
सोमवारी रात्री करनाल मुख्यमंत्री चंडिगढहून दिल्लीला जात असताना हा करनाल पासून २० किमी अंतरावर तारौरी येथे हा अपघात घडला. एक पदचारी रस्ता ओलांडत असताना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीने या व्यक्तीला धडक दिली असता त्या व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच ज्या गाडीने धडक दिली त्या गाडीतील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या अपघातात जीव गमवलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस अधीक्षक अभिषेक गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात राष्ट्रीय महामार्ग एक वर झाला आहे.
आम आदमी पार्टीमध्ये तू तू मै मै
- ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २ - नवी दिल्लीत काँग्रेस व भाजपाला नामोहरम करत सत्तेत आलेल्या आम आदमी पार्टीमध्ये दुहीची लागण झाली असून प्रशांत भूषण व योगेंद्र यादव विरुद्ध केजरीवाल असा संघर्ष निर्माण झाला आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांना आपापल्या पदावरून उतरण्यास सांगण्यात येईल अशी चिन्हे दिसत आहेत. बुधवारी आपची नॅशनल एग्झिक्युटिव्हची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे आपचे नेते आशुतोष यांनी सांगितले. नॅशनल एग्झिक्युटिव्हमध्ये २१ जणांचा समावेश असून त्यामध्ये यादव व प्रशांत भूषण या दोघांचाही समावेश आहे.केजरीवाल यांना लक्ष्य करून त्यांना नॅशनल कन्वेनर पदावरून हटवण्याचे षडयंत्र रचले गेल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी प्रशांत भूषण व यादव यांच्यावर केला आहे. तर, केजरीवाल यांच्यावर यादव यांनी उघड टीका केली आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हरयाणा व अन्य ठिकाणी झालेल्या पराभवासाठी यादव व केजरीवाल यांनी एकमेकांना देषी ठरवल्यानेही पक्षामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे समोर आले. त्यात उद्योगक्षेत्रातल्या हेरगिरीसंदर्भात काही कादगपत्रे प्रशांतभूषण गटाने मीडियाकडे पोचवल्याचा आरोपही काहीजणांनी केला आहे. तर आप ही केजरीवाल सेंट्रिक पार्टी झाल्याचा आरोप करत पक्षातच स्वराज्याची गरज असल्याचेमक प्रशांतभूषण यांनी व्यक्त केले आहे.अवघ्या दोन वर्षात दिल्लीच सत्ता ७० पैकी ६७ जागा जिंकत काबीज केलेल्या आम आदमी पार्टीत महिन्याभरातच ही वेळ यावी ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अवकाळी धिंगाणा
- मुंबई : राज्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना तडाखा बसला असून, काही भागांत पिके हातची जाण्याची भीती व्यक्त होत आहे़ पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष, डाळिंब, आंबा तर खान्देशात केळी संकटात सापडली असून, कोकणात आंबा आणि काजू काळवंडण्याची चिन्हे आहेत़ मराठवाड्यासह विदर्भात गहू, हरभरा आदी पिकांना प्रामुख्याने फटका बसला आहे़ महाराष्ट्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाचे ढग दाटून आले. विदर्भ, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने रविवारी धुमाकूळ घातला.विदर्भात पावसाचा सर्वाधिक फटका मका, गहू, हरभरा आणि आंबा पिकांना बसला. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात रविवारीही दिवसभर सुरूच होता़ नगर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांसह फळबागांवर झाला आहे़ ग्रामीण भागात सोंगणीला आलेली पिके भुईसपाट झाली़ तर अनेक ठिकाणी ऊसतोडणीवर याचा परिणाम जाणवला़ परिणामी, ‘फ्लू’जन्य आजारांसह ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे़
बीसीसीआयमध्ये पुन्हा डालमिया राज
चेन्नई, दि. १ - बीसीसीआयच्या अध्यक्षपदी जगमोहन डालमिया यांची बिनविरोध निवड होणार आहे. रविवारी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. या पदासाठी जगमोहन डालमिया यांचा एकमेव अर्ज आल्याने तेच अध्यक्ष होतील हे स्पष्ट झाले असून यामुळे शरद पवारांना मोठा हादरा बसला आहे.
सुप्रीम कोर्टाने एन, श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. आज बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. शरद पवार यांना उमेदवारी अर्जासाठी पूर्व क्षेत्रातून कोणताही प्रस्तावक मिळू शकला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर डालमिया यांना सर्व क्रिकेट क्लबकडून पाठिंबा होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर हे सचिवपदाच्या निवडणुकीत संजय पटेल व अनुराग ठाकूर यांच्यात लढत. संयुक्त सचिवपदासाठी झारखंड क्रिकेट संघाचे अमिताभ चौधी यांच्यासमोर गोव्याचे चेतन देसाई यांचे आव्हान आहे. चौधरी हे श्रीनिवासन यांच्या गोटातील आहे. हरिणायाचे अनिरुद्ध चौधरी हे कोषाध्यक्ष असतील.
डालमिया तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये बीसीसीआयच्या नवीन समितीची अधिकृत घोषणा केली जाईल असे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री दिल्लीच्या इशा-यावर चालतात - राज ठाकरे
नाशिक, दि. १ - महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा घाट घातला असून याच्याशी राज्यातील सत्ताधा-यांना काही घेणे देणे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस दिल्लीत बसलेल्या अमित शहांच्या इशा-यावर चाललात असा आरोप मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. अमित शहांनी ऊठ म्हटले की ते उठतात, निघा म्हटले की ते निघतात अशा तिखट शब्दात राज ठाकरेंनी फडवणीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
रविवारी नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेचे अधिवेशन होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनसोहळ्यात राज ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनानंतरच्या भाषणात राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली. पाच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांपासून महाराष्ट्राला मुक्त करा असे नरेंद्र मोदी सांगायचे. आता तेच मोदी शऱद पवारांसोबत बसतात, त्यांचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधत ठाकरेंनी भाजपाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेतला होता त्यावेळी आमच्यावर टीका झाली अशी आठवणही त्यांनी करुन दिली. राज्यात उद्योगधंदे कायम राहावे यासाठी कामगार संघटनांनी विनाकारण संप करु नये व मालकांनाही त्रास देऊ नये असे आवाहन ठाकरेंनी केले.
जेटलींच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाप
- पंतप्रधानांच्या नावे सहा नव्या योजना : योग करमुक्त केल्यानंतर पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर फुलले हास्यहरीश गुप्ता - नवी दिल्लीअरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छाप स्पष्टपणे दिसते. मोदींनी वर्षभर जाहीर केलेल्या योजना जेटलींच्या अर्थसंकल्पात अंतर्भूत झालेल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान, योगाचा प्रचार, गंगा शुद्धीकरण किंवा सहा कोटी शौचालये बांधण्याची योजना असो; मोदींच्या या सर्व मिशनला १०० टक्के करसवलत मिळाली आहे. त्यासोबतच कंपन्यांकडून सीएसआरच्या रूपात २ टक्के अतिरिक्त निधीही प्राप्त होणार आहे.जेटली यांनी आपल्या २८ पृष्ठांच्या आणि ९० मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मोदींचा नामोल्लेख टाळला असला आणि योजनांना थेट मोदींचे नाव देण्याचे टाळले असले तरी पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजनांचा शुभारंभ केला आहे. त्यात पंतपधान मुद्रा योजना, पंतप्रधान सुरक्षा (अपघात) विमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, पंतप्रधान विद्यालक्ष्मी कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे.जेटली यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर सुरू केलेल्या ‘अटल नवनिर्माण मिशन’ या योजनेवरही मोदींचीच छाप आहे. तसेच दिवंगत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दीनदयाळ ग्रामीण कौशल्य योजनाही सुरू करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्कील इंडिया या योजनांच्या माध्यमातून शासनात जनतेला सहभागी करून घेण्याची मोदींची दृष्टी आहे. परंतु जेटलींनी योगाला करमुक्त केल्यानंतर मोदींनीही या घोषणेचे बाके वाजवूनस्वागत केले. त्या वेळी जेटलींच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.दिवसातून दोनदा मोदींची भेटच्अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत जेटलींनी मोदींशी सातत्याने चर्चा केली. दिवसातून दोनदा ते मोदींना भेटत होते. विविध मुद्द्यांवर मोदींशी चर्चा करणे आवश्यक होते, असे जेटलींनी स्पष्ट केले.च्अर्थमंत्रालयातील काही अधिकारीही मुद्दे निकाली काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये जेटलींनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्रालयातील अरविंद मायाराम, राजीव टकरु आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटविण्यात आले होते. या सर्वांची नियुक्ती तत्कालीन संपुआ सरकारने केली होती.कवी जेटलीम्हणतात...अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कवितेच्या दोन ओळींनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करत शेरेबाजी करण्याची संधी सोडली नाही.कुछ तो फुल खिलाए हमने,और कुछ फुल खिलाने है,मुश्किल यह है, बाग में अबतककांटे कई पुराने है...असे यापूर्वीच्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उद्देशून जेटली यांनी या कवितेचा आधार घेतला.हमे मायूसी का माहोल मिला थायह बदला हुआ आर्थिक माहोल है.
अच्छे दिन नाहीच...पेट्रोल, डिझेल महागले !
नवी दिल्ली, दि. २८ - 'अच्छे दिन' येणार या आशेवर जगणा-या सर्वसामान्यांच्या आशेवर केंद्रीय बजेटच्या दिवशी सरकारने पाणी फिरवले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असतानाही देशात तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढवल्या. पेट्रोलचे दर प्रति लीटर ३ रुपये १८ पैसे तर डिझलचे दर प्रति लीटर ३ रुपये ९ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.
आज रात्री १२ वाजल्यापासून ही नवी दर वाढ लागू करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गेल्या काही महिन्यांत उतरल्याने जनतेला थोडा दिलासा मिळाला होता. मात्र आता जनतेला पुन्हा एकदा महागाईला सामोरे जावे लागणार अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरशे प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केली नाही परंतू मालवाहतूक दर ८ ते १० दक्के वाढविले आहे. मालवाहतूक दर वाढवून काही तासांचा अवधी लोटत नाही तोच आता पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परीणाम मालवाहतूक भाडेवाढीवर होणार असून त्याची झळ सर्वसामान्य नागरीकांना बसणार आहे.
आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प
- नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पातून मोदी सरकारची अर्थनीती स्पष्ट होणार असून या अर्थसंकल्पातून आम आदमीला 'अच्छे दिन' येतील आशा आहे.विकासदर मापनाच्या नव्या पद्धतीने मोजणी केल्यामुळे आगामी आर्थिक वर्षात देशाच्या विकासदरात १.१ टक्क्यांनी वाढ होत तो ८ टक्क्यांना स्पर्श करेल. अर्थकारणाला विकासाचा पुढचा टप्पा खुणावत आहे. मात्र, याकरिता आवश्यक अशा आर्थिक सुधारणा करताना त्या ‘जपून’ करण्याची सूचना शुक्रवारी सादर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात अर्थव्यवस्थेला उभारी येण्याच्या दृष्टीने विविध अंदाज वर्तविण्यात आले आहेत. नव्या आर्थिक वर्षाचे भाकीत वर्तविताना चालू आर्थिक वर्षात आर्थिक सुधारणांबाबत सरकारने जी पावले उचचली आहेत, त्याचा ठोस फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होणार असल्याचे यामध्ये नमूद केले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरली असून,या अनुषंगाने नव्या सरकारने चालू आर्थिक वर्षात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. विशेषत: डिझेलच्या किमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे, इंधनाच्या दरात झालेली कपात काही प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचविल्याने महागाई काही प्रमाणात नियंत्रणात येण्याच्या रूपाने दिसून येईल, असे यात नमूद केले आहे.देशातील बचतीचा घसरलेला दर ही सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकेल, मात्र बचतीसाठी लोकांना प्रवृत्त करण्यासाठी कर बचतीच्या साधनांत गुंतवणुकीची मर्यादा वाढविणे गरजेचे असल्याचे मतही व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसचं घोर अपयश असलेली मनरेगा ढोल पिटत सुर ठेवणार - मोदींनी उडवली खिल्ली
नवी दिल्ली, दि. २७ - रोजगार हमी देणारी मनरेगा मी बंद करणार अशी टीका विरोधक करतात असे सांगत नरेंद्र मोदींनी काळजी करू नका हे काँग्रेसचं ढळढळित अपयश आहे, त्यामुळं ही योजना बंद तर करणारच नाही उलट ढोल पिटून पिटून सुरू ठेवीन असं सांगत काँग्रेसची खिल्ली उडवली. लोकसभेमध्ये बजेटच्या अधिवेशनादरम्यान ते बोलत होते. स्वातंत्र्य मिळूनही खड्डे खोदायला लागणारी मनरेगा सुरू ठेवायला लागली हे काँग्रेसचं घोर अपयश असल्याचं सांगत मला राजकीय समज चांगली असल्याचं सांगत काँग्रेसचं हे घोर अपयश कायम जगासमोर ठेवू असे सांगितले. मनरेगा, काळा पैसा, भूमी अधिग्रहण कायदा अशा अनेक मुद्यांना स्पर्श करत मोदींनी विरोधकांवर टीका केली तसेच हे सरकार गरीबांचं आहे आणि त्यांच्यासाठीच काम करेल असं सांगितलं. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- काळ्या पैशाच्या बाबतीत G-20 च्या व्यासपीठावर पण आम्ही हा विषय घेतलाय. आम्ही काळ्या पैशाच्या बाबतीत आम्ही सतत प्रयत्न करत राहणार आणि जे कुणी आहेत त्यांना समोर आणणारच असा विश्वास मोदींनी लोकसभेतील भाषणात दिला.
- काळ्या पैशाची चर्चा होते. जे लोक काळ्या पैशाचं नाव काढत नव्हते ते आज काळ्या पैशावर बोलतात ते व्हा बरं वाटतं. आम्ही सगळ्यांना बोलायला लावलं हे आमचं यश आहे.
- तीन वर्ष सरकारने काळ्या पैशासाठी SIT स्थापन केली नाही, आम्ही ते काम पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी काही होत नाही. पण भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर धोरणांच्या आधारावर यंत्रणा चालायला हवी. जर यंत्रणा चोक असेल तर अधिका-यांना भ्रष्टाचार करायला संधीच राहणार नाही.
- मी मनरेगा बंद करीन असा आरोप होतो, परंतु माझी राजकीय समज खूप चांगली आहे. मनरेगा हा काँग्रेसचा ६० वर्षांतला जिवंत पुरावा आहे. हा पुरावा मी मिटवणार नाही, ढोल वाजवून मी मनरेगा सुरू ठेवणार आणि लोकांना कळेल की ६० वर्ष झाली पण अजून खड्डे खोदायचं काम देणारी मनरेगा ही काँग्रेसची देण आहे असं सांगत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.
- भूमीग्रहण कायद्याचा प्रश्न असता तर काँग्रेस निवडणुका जिंकलं असतं. पण शेतक-यांना ते पसंत पडलं नाही.
- स्वच्छता हे काम माझं किंवा माझ्या सरकारचं नाही तर सगळ्या सव्वाशे कोटी जनतेचं आहे. कुठल्याही नावानं स्वच्छता करा परंतु ते करण महत्त्वाचं आहे.
- केवळ मतांसाठी काम केलंत तरी स्वच्छता अभियान महत्त्वाचं आहे आणि समाजसेवा म्हणून केलंत तर जेवढी मन:शांती मिळेल तेवढी कशानंच मिळणार नाही.
- अस्वच्छता ही आजची मुख्य समस्या आहे. त्यामुळे गरीबांना फायदा होईल, महिलांना सन्मान मिळेल, मुलींची शाळेतली उपस्थिती वाढेल.
- योजना कुणी आणली तिचं नाव काय हा मुद्दा नाही, तर समस्या आहे हे सगळ्यांना मान्य आहे आणि समस्या कशी सोडवायची हा मुद्दा आहे.
- आम्ही यंत्रणा ठीक करण्यावर आणि छोट्या छोट्या गोष्टींच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचं भलं करण्याचा विचार करत आहोत.
- सुप्रिया सुळेंनी स्वच्छता अभियानाचा विषय हातात घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक आहे.
- कागदपत्रांना अटेस्ट करायला लागायचं, त्यांच्यावर हा अविश्वास दाखवणं आम्ही बंद केलं आणि सेल्फ अटेस्टेशन लागू केलं.
- मी विदेशी जातो त्याच्यावर टीका होते, परंतु मी तिथे का गेलो, कुणाला भेटलो याची पण चौकशी करा.
- जपानमध्ये मी नोबेल पारितोषिक विजेत्याला भेटलो की आदिवासींच्या सिकल सेल विकारावर उपचार आहे का हे बघण्यासाठी.
- मी ऑस्ट्रेलियात मी गेलो तिथे मी संशोधकांना भेटलो ज्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे जे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन व जास्त सकस उत्पादन करायचं तंत्रज्ञान समजण्याचा प्रयत्न केला.
- केळं हे गरीबांचं फळ आहे, गरीबांना त्यातून जास्त ताकद कशी मिळेल यावर संशोधन आहे आणि जगात जे काही चांगलं आहे ते आपल्या देशातील शेतक-यांना, आदिवासींना उपयोगाला येईल का याचाच विचार करण्यासाठी मी विदेशात जातो.
- योजनांच्या नावाबाबत टीका झाली परंतु, मुद्दा योजनेचं नाव किंवा योजना नवी हा नसून मुद्दा समस्या हा आहे
- या समस्या वारशाने आली असून त्यावर मार्ग काढला पाहिजे, जर समस्या दोन्ही बाजुंना मंजूर असेल तर चांगली गोष्ट आहे. आपण ती निपटण्याचा प्रयत्न करुया नाव काहीही असूदे.
- शाळांमध्ये ४.२५ लाख प्रसाधनगृहाची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत ६० ते ६५ हजार प्रसाधनगृहे बांधून झाली आहेत. येणा-या सुटीच्या काळानंतर जेव्हा सुरू होईल त्यावेळी मुलींच्या शाळांमधील प्रसाधनगृहांचे काम झाले असेल असा विश्वास आहे.
- सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय आहे असं सांगत काँग्रेससह विरोधकांनी आम्हाला साथ द्यावा असं आवाहन केलं.
- माझ्या सरकारचा एकचं धर्म आहे आहे भारत, धर्मग्रंथ एकच आहे घटना, पूजा करायची सव्वाशे कोटी भारतीयांची हे आमचं तत्व आहे.
- विविधतमे एकता ही भारताची ताकद आहे. सभी संप्रदायाचं फळणं व फुलणं ही बारताची विशेषता आहे. भारताची घटना सर्वसामान्य माणसाचं प्रतिबिंब आहे. संप्रदायाच्या नावाखाली कायदा हातात कुणी गेऊ नये.
- हिंदूंना व मुसलमानांना मी विचारतो की तुम्हाला एकमेकांशी लढायचं आहे की गरीबीशी असा प्रश्न मी वाचिरत आहे.
- सांप्रदायिकतेवरून देशात खूप काळापासून गढूळ वातावरण आहे आणि मला प्रश्न विचारले जात आहेत यावर मी आज काही बोलणार आहे.
- आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथम असं होईल की राज्यांची संपत्ती केंद्राच्या संपत्तीपेक्षा जास्त असेल. राज्यांना सशक्त केलं तर भारत सशक्त होईल अशी आमची धारणा आहे.
- नैसर्गिक संपत्तीतून मिळणारं उत्पन्न राज्यांना मिळणार, पण तरीही आम्ही कोल ऑक्शन केला. अनेक राज्यांना इतका महसूल मिळणार आहे की त्यांच्याकडे तिजो-या कमी आहेत.
- देशाचा पूर्व भाग अप्रगत असून त्याचा विकास पश्चिम भारताप्रमाणं व्हायला हवा असा माझा प्रयत्न आहे.
- भूमी अधिग्रहण कायदा काँग्रेसच्या बरोबर आम्ही आणला. त्यात काही सुधारणा करणं हाच आमचा हेतू आहे. राजनीती करणं हा आमचा उद्देश नाही.
- भूमी अधिग्रहण कायद्याच्या बाबतीत क्रेडिट घेण्याचा प्रयत्न नको करूया. शेतक-याच्या विरोधात काही कमी राहिली असेल तर दूर करूया. याचा राजनैतिक फायदा काँग्रेसने घ्यावा माझं काही म्हणणं नाही. पण देशाचं नुकसान करू नका.
- भूमी अधिग्रहण कायद्यात जर तुम्हाला कमतरता वाटत असेल तर मला सांगा मी बदल करायला तयार आहे. पण, शेतक-यांच्या नावाखाली खोटा विरोधा करू नका.
वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव
सिडनी, दि. २७ - दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव करीत आफ्रिकेने विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.
ए.बी.डिव्हिलियर्सने अवघ्या ६६ चेंडूत केलेल्या १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकेने विश्वचषकातील आत्तापर्यंतची दुस-या क्रमांकाची सर्वौच्च धावसंख्या उभारली. सिडनी क्रिकेट मैदानावर आफ्रिकन फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करीत ४००चा टप्पा ओलांडला.आफ्रिकन संघाने ५ गडी गमावून वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी भल्यामोठया ४०९ धावसंख्येचे आव्हान ठेवले. आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेला कॉक् १२ धावावर बाद झाला परंतू त्यानंतर आलेल्या आमलाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हमला चढवला. हाशिम आमलाने ६५, ड्यू प्लेसिस ६२, रोस्सो ६१, मिल्लर २०, आणि ए.बी.डिव्हिलियर्सने केलेल्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकन संघाने ५० षटकात ५ गडी गमावून ४०८ धावा केल्या.
विश्वचषकाच्या साखळी फेरीतच वेस्ट इंडिजला तब्बल ४०९ धावांचे आव्हान समोर आल्यानंतर विंडिजची सुरूवात आक्रमक होईल हा समज चुकीचा ठरला. सलामीला आलेल्या ख्रिस गेलला अवघ्या ३ धावांत बाद करीत आफ्रिकन गोलंदाजांनी विंडिजला पहिला धक्का दिला. वेस्ट इंडिजकडून जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सिमन्स ००, सॅमी ०५, रसेल ००, बेन ०१, जे टेलरच्या नाबाद १५ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ १५१ धावाच करता आल्या. विंडिजच्या फलंदाजांना सूर न गवसल्याने त्यांना विश्वचषकातील २५७ धावांनी अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून सर्वाधिक इमरान ताहिरने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर एबोट, मार्कोलने प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश मिळवले तर स्टेनला १ गडी बाद करता आला.
द. अफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर, विंडिजला विजयासाठी हव्या ४०९ धावा
सिडनी, दि. २७ - ए. बी. डिव्हिलियर्सच्या झंझावातापुढे वेस्ट इंडिजची गोलंदाजीची धुळधाण उडाली आणि दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४०९ धावांचे आव्हान ठेवले. ४०८ ही आत्तापर्यंतची विश्वचछकातील दुस-या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पाठलाग करून सामना जिंकण्याचा विक्रम याआधी ३३५ धावसंख्येचा आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी चमत्काराची गरज आहे. डिव्हिलियर्सने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १६२ धावा फटकावल्या. त्याने शेवटच्या षटकातच ३० धावांची लयलूट केली.
वेस्ट इंडिजची सुमार गोलंदाजी व ढिसाळ क्षेत्ररक्षण अफ्रिकेच्या पथ्यावर पडलं. गेल्या सामन्यात झिम्बाव्बेच्या समोर द्विशतक झळकावणारा ख्रिस गेल आज पुन्हा तशीच खेळी करतो का याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष लागले आहे. अमलाने ६५, ड्युप्लेसिसने ६२ धावा केल्या. होल्डरच्या १० षटकांमध्ये १०४ धावा काढण्यात आल्या.
हिंदुधर्मात घरवापसी केलेल्या ख्रिश्चनांना मिळणार आरक्षणाचा लाभ - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली, दि. २७ - ख्रिश्चन धर्मातून पुन्हा हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या पूर्वाश्रमीच्या दलितांना आरक्षणाचा लाभ मिळेल असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने गुरुवारी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकर, जेम्स मेस्सी, मंडल आयोग व चिनप्पा आयोग यांच्या लिखाणाचा दाखला देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की उन्नतीच्या आशेने हिंदू धर्मातून ख्रिश्चन झालेल्या अनेकांची अवस्था सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. जर अशा व्यक्ती पुन्हा हिंदूधर्मात आल्या व त्यांनी त्यांच्या पूर्वजांची जात स्वीकारली तर त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
जरी दोन चार पिढ्यांपूर्वी हिंदू व्यक्ती ख्रिश्चन झाल्या असतिल तरीही आताच्या त्यांच्या वारसांना हिंदूधर्मात गेल्यास आरक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असे कोर्टाने म्हटले आहे. अर्थात, त्यासाठी त्यांनी आपल्या मूळ दलित जातीत जावे लागेल असेही कोर्टाने म्हटले आहे. अर्थात, यासाठी तीन गोष्टी आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. एक म्हणजे अशा व्यक्तीने त्याची मूळ जात मागासवर्गीय असल्याचे सिद्ध केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या म्हणजे हिंदू धर्माचा त्याने पुन्हा स्वीकार करायला हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाजाने हे स्वीकारायला हवे. त्याचप्रमाणे ख्रिश्चन व्यक्तीशी विविह ही बाब केवळ एखाद्या व्यक्तिला आरक्षणासाठी अपात्र ठरवत नाही.
ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तिचे जात प्रमाणपत्र रद्द केल्याप्रकरणी न्यायालयात हे प्रकरण गेले असता सुप्रीम कोर्टाने सदर निकाल दिला आहे. त्यामुळे हिंदुधर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांना मागासवर्गीयांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे परंतु ते पुन्हा हिंदु धर्मात आल्यास व त्यांनी पुन्हा आपली आधीची मागास जात स्वीकारल्यास हे आरक्षण त्यांना मिळू शकेल असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
कोर्टाच्या या आदेशामुळे वादग्रस्त ठरलेल्या संघपरीवाराच्या घरवापसी कार्यक्रमावरकाय परिणाम होतो आणि समाजात काय प्रतिक्रिया उमटतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राजभवनमध्ये आज ‘महाराष्ट्र महोत्सव’
- मुंबई : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा महाराष्ट्र महोत्सव उद्या (शुक्रवार) राजभवनात साजरा होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा महोत्सव रंगणार आहे.गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी अशा महाराष्ट्राच्या विविध लोककलांचे दर्शन या वेळी घडविण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य व उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या प्रसंगी उपस्थित असतील.‘अमृतातेही पैजा जिंके’ असा ‘मराठीचा बोलू’ विकसित झाला तो मराठी मुलुखातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या बोलींनी. बोलींचे, मौखिक परंपरांचे आणि लोकसंस्कृती व लोककलांचे अतूट नाते आहे. हेच मध्यवर्ती सूत्र ठेवून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोककलांचा जागर राजभवनमध्ये होणार आहे,’ असे लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी सांगितले.या महोत्सवात प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, तालवाद्यसम्राट विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, प्रमिला लोदगेकर, शाहीर सुरेश जाधव, हेमाली शेडगे, मदन दुबे, योगेश चिकटगावकर, कीर्ती बने, सुभाष खरोटे आणि लोककला अकादमीचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वे बजेट - Top 20 Points
- - सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणारी बाब म्हणजे भाडेवाढ केलेली नाही.- महिलांच्या सुरक्षेसाठी निवडक मार्गांवरील लेडीज डब्ब्यांमध्ये कॅमेरे बसवणार.- कोकण रेल्वेवर ३ वर्षांत ५०,००० जणांना रोजगार मिळणार.- ४०० रेल्वे स्टेशनांमध्ये वाय-फाय सेवा देणार.- दरवर्षी अपघातांमुळे शेकडोंचा बळी घेणारी ३,४३८ मानवरहित फाटकं हद्दपार करणार, त्यासाठी लागणा-या पुलांसाठी ६,५८१ कोटी रुपयांची तरतूद.- लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील जनरल डब्ब्यांमध्येही मोबाईल चार्जिंगची सुविधा.- बड्या १० शहरांमधील रेल्वे स्थानके सॅटेलाईट टर्मिनल बनवणार.- जनरल डब्यांची संख्या वाढवणार.- गाड्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा प्रवाशांना एसएमएस द्वारे कळवणार.- प्रवासाचा वेळ २० टक्क्यांनी कमी करणार.- बंदरांना जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार ज्याचा महाराष्ट्रातल्या दिघीसारख्या बंदरांना फायदा. त्यासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद.- ९ हायस्पीड कॉरीडॉर.- १७,००० प्रसाधनगृहे बायोटॉयलेट्समध्ये बदलणार.- रेल्वेच्या जागांच्या वापरातून सौरउर्जा निर्माण करणार.- खासगी कंपन्यांना पुढे येऊन रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्याचे आवाहन.- कायकल्प प्रकल्प, रेल्वेचा चेहरा मोहरा संपूर्णपणे बदलण्याचा पण प्रभूंनी केला आहे. कामाची पद्धत, निर्णयक्षमता, कामाचं वातावरण आणि प्रवाशांना चांगली सेवा देणारी संस्कृती रेल्वे कर्मचा-यांमध्ये रुजवणार.- लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्यांसाठी १२० कोटी रुपयांचा निधी देणार.- रेल्वेतून प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑनलाइन व्हिलचेअर बुक करण्याची सुविधा देणार- प्रवाशांसाठी १३८ ही हेल्पलाईन व सुरक्षाविषयक मदतीसाठी १८२ ही टोलफ्री सेवा.- पूर्वोत्तर आणि जम्मू काश्मीरमध्ये रेल्वेचे जाळे तयार करण्यास प्राधान्य.
भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे
मुंबई, दि. २६ - भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही अशा आक्रमक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला विरोध दर्शवला आहे.
भूसंपादन विधेयकावरुन भाजपाला विरोधकांसोबतच एनडीएतील घटकपक्षांकडूनही विरोध होत आहे. शिवसेनेने यापूर्वीही विधेयकाला विरोध दर्शवला असला तरी गुरुवारी सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी भूसंपादन विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. शेतकरी जमिनीवर माऊलीसारखे प्रेम करतो, त्या माऊलीस आपण शेतक-यांकडून हिरावून घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले आहे. देशाचा आर्थिक व औद्योगिक विकास व्हायलाच हवा पण त्यासााठी शेतक-यांच्या बळी नको असेही त्यांनी म्हटले आहे. औद्योगिक घराण्यांसाठी विद्यमान सरकार इस्टेट एजंटची भूमिका निभावत आहे का असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
वन्यप्राण्यांकडून २८ जणांचा मृत्यू
गेल्या दहा वर्षांपासून हत्ती, बिबट्या, गवे अशा वन्य प्राण्यांचा वावर मानवी वसाहतीकडे वाढतो आहे. रविवारी (दि. २२) राधानगरी तालुक्यात हत्तीने एका शेतकऱ्याला सोंडेत पकडून आपटले. त्यामध्ये तो जखमी शेतकरी मृत्यूूशी झुंज देत आहे. वन्यप्राणी आणि मनुष्य असा टोकाचा संघर्ष ऐरणीवर आला आहे. म्हणूनच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कितीजणांना जीव गमवावा लागला, वन विभागाकडून कितीजणांवर गुन्हे दाखल केले, नुकसानभरपाई किती नाममात्र आहे, या अंगाने वेध घेणारी मालिका आजपासून...
भीमगोंडा देसाई-कोल्हापूर
कोल्हापूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांत २००४ पासून आतापर्यंत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात २८ जणांना जीव गमवावा लागला. एकूण ८० जण जखमी झाले. मृतांपैकी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १३ जणांना हत्तीने चिरडले आहे. उर्वरितांचा मृत्यू गवा, बिबट्या यांच्या हल्ल्यांत झाला आहे. अजूनही त्यांचा उपद्रव सुरूच आहे.
विकासाच्या नावाखाली बेसुमार जंगलतोड होत आहे. स्वार्थासाठी जंगलांवर अतिक्रमण वाढते आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये जंगलांना आगी लावल्या जात आहेत. पर्यटनासाठी जंगलात घुसखोरी होत आहे. जंगले विरळ होत आहेत. या महत्त्वाच्या कारणांमुळे वन्य प्राण्यांची आश्रयस्थानेच उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी हत्तींसह वन्य प्राण्यांनी मानवी वसाहतींकडे मोर्चा वळविला आहे.
विभागातील या पाच जिल्ह्यांत सन २००४ पासून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे अधिक वाढला. पूर्वी सर्कशीमध्ये पाहावे लागणारे हत्ती गावामध्ये घुसू लागले. शेतकऱ्यांना त्यांचे सहज दर्शन होऊ लागले. जंगलाशेजारील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. कोणत्याही क्षणी हत्ती, बिबट्या, गव्याचा हल्ला होऊ शकत असल्यामुळे त्यांचे जगणेच भयकंपित झाले आहे.
हल्ल्याच्या भीतीने जंगलालगत असलेल्या शेकडो एकर जमिनी कसणे शेतकऱ्यांनी बंद करून त्या पडिकच ठेवणे पसंत केले आहे. वन्य प्राण्यांना पूर्णपणे रोखण्यात वन विभागाला यश आलेले नाही. हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहांपैकी आठजणांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. एका मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस उपलब्ध नसल्याने भरपाई दिलेली नाही. आॅगस्ट २००६ मध्ये राधानगरी अभयारण्यामध्ये तस्कराच्या हल्ल्यात मृत झालेल्या वनमजुराच्या वारसांना वन्यजीव विभागाकडून दोन लाख देण्यात आले आहेत. जखमी २३ जणांना ६ लाख ७० हजार रुपये भरपाई देण्यात आली आहे. (क्रमश:)
दोन जिल्ह्यांतील स्थिती
सन २००४ पासून २०१४ अखेर हत्तींच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी या तालुक्यांतील पाचजणांचा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, सावंतवाडी या भागांतील आठजणांचा मृत्यू झाला आहे.
सन २०१० पासून आतापर्यंत बिबट्या, गवा अशा वन्यप्राण्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील ११, सातारा जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रत्येकी एक अशा १५ जणांचा मृत्यू झाला आहे.
अटीतटीच्या लढतीत आयर्लंडची यूएईवर मात
- ऑनलाइन लोकमतब्रिस्बेन, दि. २५ - आयर्लंडविरुध्द संयुक्त अरब अमिरात (यूएई ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात आयर्लंडने यूएईवर ४ चेंडू व २ गडी राखून विजय मिळवला.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत कधी आयर्लंडचे तर कधी यूएईचे पारडे जड वाटत होते परंतू अखेर आयर्लंडने यूएईवर अखेरच्या षटकात ४ चेंडू राखून विजय मिळविला. वर्ल्डकपमधील या विजयाने आयर्लंडचा हा दुसरा विजय आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिल्याच लढतीत पराभव करीत आयर्लंडने हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले होते. प्रथम फलंदाजी करताना यूएईने ५० षटकात ९ बाद २७८ धावा करण्यात यश मिळवले. यूएईचे आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या आयर्लंडची सुरुवात समाधारनकारक झाली नाही. सलामीला आलेला स्ट्रीलाइंग अवघ्या ३ धावा काढून बाद झाला. आयर्लंडकडून सर्वाधिक ८० धावा या विल्सनने केल्या. ओबोरीएन ५०, बलबिर्नी ३०, जॉएस ३७, पोर्टफिल्ड ३७, मुनी २ , कुसक नाबाद ५ तर डॉकरेलने केलेल्या नाबाद ७ धावांच्या बळावर आयर्लंडने हा सामना ४ चेंडू व २ गडी राखून जिंकला.
राज्यांना ‘कर’लॉटरी!
- नवी दिल्ली : १४व्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १0 टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय २0१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना १.७८ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल केंद्राकडून मिळणार आहे. शिफारशींमुळे राज्यांना आता अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे.रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वित्त आयोगाने आपला अहवाल तयार केला आहे. महसुलाची चणचण असलेल्या ११ राज्यांना ४८,९0६ कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. या राज्यांत विभाजनानंतरचे आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा निधी २0१५-१६ या वर्षातच अदा करावयाचा आहे. २0२0 पर्यंत एकूण १.९४ लाख कोटींचा निधी केंद्राकडून अदा होणार आहे.२0१५-१६ या आर्थिक वर्षात राज्यांना एकूण ५.२६ लाख कोटी रुपयांचा वाटा मिळेल. २0१४-१५ या वर्षात ही रक्कम ३.८४ लाख कोटी होती. याचाच अर्थ राज्यांना घसघशीत १.७८ लाख कोटींची अतिरिक्त वाढ मिळाली आहे.संपूर्ण पाच वर्षांच्या काळात म्हणजेच २0१९-२0 सालापर्यंत राज्यांचा एकूण महसुली वाटा ३९.४८ लाख कोटींचा असेल.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वित्त आयोगाचा अहवाल संसदेत सादर केला. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत त्यांनी, वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे, असे जाहीर केले. रालोआ सरकार संघीय प्रणालीबाबत कटिबद्ध आहे, हेच यावरून दिसून येते आणि राज्यांना अधिक निधी मिळणार याचा आम्हाला आनंद आहे, असे वित्तमंत्री म्हणाले.वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे राज्यांना अतिरिक्त निधी उपलब्ध होणार असून, त्यातून राज्यांना आपल्या गरजेनुसार विकासकामे करता येऊ शकतील, असे मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. केंद्रीय करांत राज्यांचा वाटा याआधी ३२ टक्के होता. वित्त आयोगाच्या शिफारशीनंतर तो आता ४२ टक्के होईल. याशिवाय पाच वर्षांत पंचायती आणि महानगरपालिकांसाठी २.८७ लाख कोटींचा अतिरिक्त निधी केंद्राकडून मिळेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राहुल गांधींची सुट्टीची वेळ चुकलीच - दिग्विजय सिंह
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने वाद निर्माण झाला असतानाच काँग्रेस नेते आणि राहुल गांधींचे कट्टर समर्थक दिग्विजय सिंह यांनीदेखील सुट्टीवरुन काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. राहुल गांधी यांना सुट्टीसाठी योग्य वेळ वेळ निवडता आली असती असे सूचक विधान करत दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. यात भर म्हणजे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या अधिवेशनात पक्षाच्या उपाध्यक्षानेच सुट्टीवर जाणे अयोग्य असल्याची चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे राहुल गांधीच्या सुट्टीविषयी भाष्य केले. दिग्विजय म्हणतात, पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी सुट्टीवर जात असतील तर यात गैर काहीच नाही. फक्त या सुट्टीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून राहुल गांधी यांच्या सुट्टीवर टीका केली. राहुल गांधी यांच्या सुट्टीने देशाला काहीच फरक पडत नाही. पण पक्षाच्या भावी अध्यक्षाने महत्त्वाच्या वेळी सुट्टीवर जाऊन पक्ष, देशहित आणि संसदीय कामकाजात किती निष्काळजी आहोत हेच जनतेला दाखवून दिले असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.
काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी चिंतनासाठी घेतली काही आठवड्यांची रजा
एकामागोमाग एक निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी राहूल गांधींनी चिंतन करण्यासाठी काही आठवड्यांची रजा घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच ही माहिती दिली असून त्यामुळे राहूल बजेटच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार नाहीत. राहूल यांच्या या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपाच्या गोटातून तर राहूल गांधींनी राजकारणातून कायमची रजा घ्यावी अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
बजेटच्या पहिल्याच दिवशी राहूल गांधी यांची अनुपस्थिती खटकणारी होती. त्याचा नंतर खुलासा करताना राहूल गांधींनी काही आठवड्याची रजा घेतली असून पक्षाला पुढे कसे घेऊन जायचे, पक्षाची पुनर्बांधणी कशी करायची यासाठी विचारविमर्ष करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावेळी बजेटसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडत असताना त्यावेळी प्रसंगाचे गांभीर्य पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बाळगायला हवं असं मत व्यक्त होत आहे. संसदेचं कामकाज अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं असं मत काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही व्यक्त केलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांची मात्र राहूल गांधी यांच्या रजेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भंबेरी उडाली आहे. दिल्ली विधानसभेमध्ये १५ वर्षे राज्य केल्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिलाली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांची अनुपस्थिती निरीक्षकांना खटकत असून काँग्रेसवर टीका करण्यासाठी विरोधकांना निमित्त मिळाले आहे.
नितीशकुमार पुन्हा होणार मुख्यमंत्री
- पाटणा - संयुक्त जनता दलाचे (संजद) नेते नितीशकुमार रविवारी सायंकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असले तरी त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही.जितनराम मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी संजदचे नवे विधिमंडळ पक्षनेते नितीशकुमार यांना सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले आणि बिहारमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षावर पडदा पडला. नितीशकुमार यांनी आपल्याला १३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता आणि राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष या आमदारांना हजरही केले होते. या वेळी राजदचे २४, काँग्रेसचे ५, भाकपाचा १ व १अपक्ष आमदार एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे होते.हे माझे सौभाग्य -विधानसभा अध्यक्षबिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी मावळते मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान घेण्यात आलेले निर्णय योग्य, संवैधानिक आणि नियमानुसार होते, असे स्पष्ट करतानाच मांझी यांनी माझ्यामुळे राजीनामा दिला असल्यास ते मी माझे सौभाग्य समजतो, असे प्रतिपादन केले आहे. शनिवारी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले.
मोदींच्या सूटची ४ कोटी ३१ लाख रुपयांत खरेदी
ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. २० पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंद गळ्याच्या सूटची आज विक्री झाली असून हा सूट तब्बल ४ कोटी ३१ लाख रुपयांना विकण्यात आला.
धर्म नंदन समुहाचे मालक हितेन भाई पटेल यांनी हा सूट विकत घेतला आहे. हितेन भाई पटेल हे हि-यांचे व्यापारी आहेत. 'नरेंद्र दामोदरदास मोदी' असे रेषांमध्ये नाव गुफलेला सूट मोदींनी २६ जानेवारी रोजी बराक ओबामा भारत भेटीवर आले असता घातला होता. त्यांच्या या महागड्या सूट वरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यावर मौन बाळगत पंतप्रधानांनी या सूटचा लिलाव करून येणारी रक्कम गंगा स्वच्छता अभियानाकरता दान देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर गेले तीन दिवस लिलाव प्रक्रिया सुरू झाली असता दहा लाखांच्या सूटची किंमत बोलीमध्ये वाढतच होती. याकरता लवजी बादशहा आणि जयंती अकलारा यांनी हे देखील पटेल यांचे प्रतिस्पर्धी होते. परंतू, शेवटच्या काही क्षणांमध्ये ४ कोटी ३१ लाख रुपयांना पटेल यांनी हा सूट विकत घेतला. पंतप्रधान मोदींबद्दल आदर असून त्यांनी हा सुट स्वतः मला भेट म्हणून द्यावा अशी इच्छा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली. हा सूट कार्यालयात आठवण म्हणून ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले असून खरेदीची रक्कम ही राष्ट्र कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही - मोदींचा इशारा
धार्मिक हिंसा व असहिष्णूता यावर पंतप्रधान मौन धारण करतात अशी टीका विरोधकांकडून सुरु असतानाच मंगळवारी मोदींनी याविषयी रोखठोख भूमिका मांडली. देशभरात कोणत्याही प्रकारची धार्मिक हिंसा खपवून घेणार नाही अशी इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.
दिल्लीत गेल्या दिवसांपासून चर्चवर हल्ले होत असून देशाच्या अन्य भागांमध्येही हिंदूत्वावादी संघटनेचे नेते प्रक्षोभक विधान करत वातावरण चिघळवत आहे. केंद्रात मोदींची सत्ता आल्यापासून देशभरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याने मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. अखेरीस मंगळवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदींनी मौन सोडले. मोदी म्हणाले, आमचे सरकार प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य मिळेल याची दक्षता घेईल, कोणालाही कोणत्याही दबाबाविना त्याच्या धर्माचे अनुकरण करता येईल.
कोणत्याही धर्माच्या कोणत्याही समुहाने जर धर्माच्या आधारे हिंसा पसरवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. आमचे सरकार कोणत्याही धार्मिक गटाच्या छुप्या किंवा उघड हिंसा खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी कट्टरतावादी संघटनांना दिला.
AIB च्या शोवर आमीर खानही नाराज
अश्लील शेरेजाबी व अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ यामुळे वादग्रस्त ठरलेल्या एआयबी शोवर बॉलीवूडमधील मि. परफेक्शनिस्ट आमीर खानही नाराज आहे. एआयबी शो हा अतिशय अश्लाघ्य आणि आक्षेपार्ह असून या शोमध्ये शाब्दीक हिंसा होती अशा शब्दांत आमीरने एआयबीवर टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून यूट्यूबवर अपलोड झालेला एआयबीचा शो हा वादग्रस्त शो ठरला होता. या शोमध्ये करण जोहर, अभिनेता रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर हे सहभागी होते. तर दिपीका पादुकोण, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट या अभिनेत्रीही हा शो बघण्यासाठी उपस्थित होत्या. या शोमध्ये करण जोहर, रणवीर व अर्जून या तिघांनी अत्यंत अश्लील भाषेत एकमेकांवर विनोद केले. या शोवर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर एआयबीने यूट्युबवरुन व्हिडीओ हटवला आहे. शोविरोधात पोलिसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. या शोवर टीका करणा-यांमध्ये आता आमीर खानचाही समावेश झाला आहे.
एका कार्यक्रमात आमीर खानने एआयबीवर त्याची भूमिका मांडली. आमीर म्हणतो, मी हा शो पूर्ण बघितला नाही. पण त्याच्या क्लिपींग मी बघितल्या असून त्या बघून मला अक्षरशः धक्काच बसला. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्यांचा अधिकार आहे यात काहीच गैर नाही. पण या शोमधून तुम्ही किती हिंसक आहात हेच दिसते. एखाद्याला बोलवून त्याला शिवीगाळ करुन त्याचा अपमान करणे चुकीचे आहे. या शोमध्ये शाब्दीक हिंसा असल्याचे मला वाटते असे मत आमीरने व्यक्त केले.
एआयबीचा शो बघून मी करण जोहर व अर्जूनला झापलंच असे आमीरने आवर्जून सांगितले. एखाद्याला २५ शिव्या घालून तुम्ही इतरांना इम्प्रेस कराल तर हे मला पटत नाही. १४ वर्षाच्या मुलालाच हे पटू शकते. एखाद्याला न दुखवता त्यांना हसवणं हीच खरी कला आहे असा सणसणीत टोलाही आमीरने लगावला. कलाकार म्हणून काम करताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवायला हवे असा सल्लाही त्याने दिला.
दिल्लीत आपच्या 'झाडू'ने केली भाजपाची सफाई
नवी दिल्ली, दि. १० - अवघ्या देशभराचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला भक्कम आघाडी मिळाली आहे. दिल्लीत आप तब्बल ६७ जागांवर आघाडीवर असून भाजपा फक्त ३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही.
उत्कंठा वाढविणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा फैसला आज होत आहे. राजधानीतील तख्तासाठी भाजपा आणि आम आदमी पार्टी यांच्यात थेट लढत आहे. सकाळी ८ वाजता १४ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. दिल्लीतील ७० जागांसाठी ६७३ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील ६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.विविध वाहिन्यांच्या एक्झिट पोल्समध्ये आम आदमी पक्षाला कौल देण्यात आला होता. अपेक्षेप्रमाणे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. मतमोजणीच्या तासाभरानंतरच आपने बहुमताचा आकडा ओलांडत भाजपाला धक्का दिला. भाजपाच्या उमेदवार किरण बेदी या कृष्णानगर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर चांदनी चौक या मतदारसंघात भाजपाच्या वाटेला फक्त ९१ मतं आली असून या मतदारसंघात भाजपा सध्या तिस-या स्थानावर आहे. विशेष बाब म्हणजे याच मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते डॉ. हर्षवर्धन यांना भरभरुन मतं दिली होती.
भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी, काँग्रेसचे उमेदवार अजय माकन, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या पराभवाच्या छायेत आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया, सोमनाथ भारती हे नेते विजयाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दिल्लीत घवघवीत यश मिळाल्यावर अरविंद केजरीवाल हे १४ फेब्रुवारीरोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीरोजीच केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आता वर्षभराने ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. रामलीला मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे.























.jpg)






















No comments:
Post a Comment